Ad will apear here
Next
मनाच्या श्लोकांच्या सामूहिक पठणाचा पुण्यात विश्वविक्रम
१२ हजार विद्यार्थ्यांनी केले पठण

पुणे : तब्बल १२ हजार शालेय विद्यार्थ्यांनी मनाच्या श्लोकांचे सामूहिक पठण करण्याचा विश्वविक्रमी उपक्रम पुण्यात २३ फेब्रुवारी २०१९ रोजी राबविण्यात आला. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय अर्थात एसपी कॉलेजच्या प्रांगणात सकाळी आठ ते दहा या वेळेत हा उपक्रम झाला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक पठण करण्याच्या या घटनेची गिनीज बुकमध्ये नोंद होणार आहे.
 

पुण्यातील निनाद संस्था, ओरायन स्टुडिओ, मनःशक्ती केंद्राचे मयूर चंदने, द्वारिका साउंड आणि समर्थ व्यासपीठ यांच्या वतीने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ओरायन स्टुडिओचे आशिष केसकर, समर्थ व्यासपीठाचे डॉ. राम साठ्ये, द्वारिका साउंडचे बाबा शिंदे, निनाद संस्थेचे उदय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘१२ हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक श्लोकपठण करण्याचा विक्रम पुण्यात घडला आहे. या आधी राजस्थानमधील १५०० विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेत अशा प्रकारचा विक्रम झाला होता. तो आता मोडला गेला आहे,’ अशी माहिती निनाद संस्थेचे प्रमुख उदय जोशी यांनी दिली. 


या वेळी २१ श्लोकांचे एका सुरात पठण करण्यात आले. श्लोकांचे सुलेखन सुनील कुरणे यांनी केले होते, तर ओरायन स्टुडिओचे आशिष केसकर यांनी हे श्लोक संगीतबद्ध केले होते. अहिल्यादेवी प्रशालेच्या विद्यार्थिनी आणि रमणबाग प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी यासाठी समूह स्वर दिला होता. पुणे शहर आणि उपनगरातील ५० पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता. जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत सुमारे १०-१२ दिवस आधी या उपक्रमाची तयारी  करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या होत्या.

धीरगंभीर आवाजात झालेल्या मनाच्या श्लोकांच्या पठणाने संपूर्ण वातावरण भारून गेले होते. श्लोक पठणानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘जय जय रघुवीर समर्थ’च्या घोषाने वातावरणात निराळे चैतन्य निर्माण झाले होते. पालक आणि नागरिकही मोठ्या संख्येने या उपक्रमाला हजर होते.

शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांचे महत्त्व आजच्या काळातही कमी झालेले नाही. मुलांच्या जडणघडणीत आजही त्यांचे योगदान मोलाचे ठरते. आजच्या काळातही त्यातील शिकवण समर्पक ठरते. मनाचे आणि शरीराचे स्वास्थ उत्तम राहावे, बळकट शरीर आणि बळकट मन कसे घडवावे यांची शिकवण देणाऱ्या मनाच्या श्लोकांचे नित्यनेमाने पठण करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मार्ग दाखवणाऱ्या समर्थ रामदासांचे कालातीत मनाचे श्लोक हा महाराष्ट्राचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा आहे. 

विद्यार्थ्यांनी या श्लोकांचे पठण केल्यास स्मरणशक्ती वाढते, बुद्धिवर्धन आणि प्रज्ञावर्धन होते. त्यामुळे लोणावळा येथील मनःशक्ती केंद्राने विद्यार्थ्यांसाठी मनाचे २१ श्लोक निवडून पाठ्यनिर्मिती केली आहे. ते सर्वांपर्यंत पोहोचावेत, या श्लोकांच्या पठणाचे महत्त्व आजच्या शालेय विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

‘स्मरणशक्ती वाढविण्यासाठी पाठांतर उपयोगी ठरते. मनाचे श्लोक एका सुरात, लयीत म्हटले जातात. त्यामुळे अगदी ज्येष्ठ व्यक्तींच्याही ते आजही लक्षात असतात, हे आपण बघतो. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना स्मरणशक्ती उत्तम असणे महत्त्वाचे असते. त्याकरिता, सातत्याने म्हटलेली गोष्ट निश्चित पक्की होते. मनाचे श्लोक नियमित म्हटल्याने पाठ होतात. पर्यायाने स्मरणशक्ती, एकाग्रता वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांसाठी हे खूपच उपयुक्त आहे. ‘मनःशक्ती’ने २१ श्लोक एका विशिष्ट पद्धतीने गुंफून अत्यंत उपयुक्त पाठ्यक्रम तयार केला आहे. मनाचे श्लोक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कसे उपयुक्त आहेत, याचे महत्त्व या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांच्याही लक्षात आले आहे,’ अशी प्रतिक्रिया या उपक्रमात सहभागी झालेले पालक जयंत वाघ यांनी व्यक्त केली. 

या उपक्रमाला गिनीज सल्लागार मिलिंद वेर्लेकर, गिनीज ऑडिटर प्रीतम आठवले आणि गिनीज सॉलिसिटर अॅड. वैजनाथ विंचूरकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. या उपक्रमाचे संयोजन रामलिंग शिवणगे, सुमंत वाईकर यांनी केले. अमित लोणकर, किरण माळी, सचिन माने यांनी तांत्रिक साह्य केले. 


(मनाच्या श्लोकांच्या विश्वविक्रमी सामूहिक पठणाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZKQBX
Similar Posts
पुण्याच्या संदीप सिन्हांनी काढले जगातील सर्वांत मोठे तैलचित्र पुणे : पुण्यातील चित्रकार संदीप सिन्हा यांनी काढलेल्या हिमालयाच्या चित्राची जगातील सर्वांत मोठे व्यावसायिक तैलचित्र म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (जीडब्ल्यूआर) नोंद झाली आहे. त्यांनी ४८.७८ चौरस मीटर आकाराचे चित्र रेखाटून आधी अमेरिकेच्या नावावर असलेला विक्रम मोडला आहे. त्यामुळे पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे
मार्स मेलविन.. विशीपूर्वीच मेलविन मार्स अमेरिकेतील सर्वांत प्रसिद्ध फुटबॉलपटू बनला. भविष्याची ददात मिटेल असा करार होण्याआधीच स्वतःच्या आई-वडिलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक झाली. त्याला देहान्ताची शिक्षा बजावण्याच्या काही सेकंद आधी एकाने ते खून केल्याची कबुली दिल्याने मेलविनची सुटका झाली. त्यामागे अनेक रहस्ये दडलेली होती
‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ आरत्यांमध्ये हमखास चुकीच्या म्हटल्या जाणाऱ्या शब्दांवर कोटी करणारे संदेश हल्ली सोशल मीडियावर फिरत असलेले दिसतात. अशाच काही संदेशांवरूनच पुण्यातील सायली दामले यांना एक भन्नाट कल्पना सुचली. प्रबोधनाचा उद्देश ठेवून त्यांनी या चुकीच्या शब्दांना गंमतशीर चित्रांमध्ये उतरवलं. ‘उच्चारण’ या नावाने सुरू केलेली
मंजुश्री ओक यांचा विक्रम; १२२ भाषांमधील गाण्यांचे १३ तास सादरीकरण पुणे : भारतीय भाषांची समृद्धी जगासमोर मांडण्यासाठी पुण्यातील गायिका मंजुश्री ओक यांनी १२२ भारतीय भाषांमधील गाणी सलग १३ तासांच्या कार्यक्रमात सादर केली. १० ऑक्टोबर रोजी झालेल्या या अनोख्या विक्रमाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये होण्याची शक्यता आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language